वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर

24 Aug 2018 , 11:17:44 PM

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा प्रशासन पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपाचे शिबिर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या ग.दि.माडगुळकर सभागृहात घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, केंद्रिय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, खा. सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका समाजाची असते. ते आपले आयुष्य कुटुंबासाठी, व्यवसाय-उद्योगासाठी व समाजासाठी देतात. त्यांचा उतरतीचा काळ समृद्धीचा जावा, जो अनुभव कमवला तो नव्या पिढीला देण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी आणि हे करण्यासाठी शारिरीक कमतरता नीटनेटकी कशी करता येईल यासाठीची उपाययोजना समाजातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा या कार्यक्रमाचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केले.

यापूर्वीही अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. काहींना श्रवणयंत्रे दिली, काहींच्या अपुऱ्या दृष्टीच्या समस्या दूर केल्या. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या दूर होण्यासाठी काही साहित्यांचे वाटप केले. या शिबिराचे वैशिष्ट्य असे की हे सगळे निःशुल्क आहे. वाढत्या वयातसुद्धा उत्साहाने कार्यरत राहण्यासाठी या योजनेचा लाभ होईल, असेही पवार म्हणाले. खा. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

संबंधित लेख