दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येची निरपेक्ष, पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी - जयंत पाटील

22 Aug 2018 , 07:13:58 PM

येत्या २८  आणि २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संमेलन दिल्लीत घेण्यात येणार असून राष्ट्रीय पातळीवरचे सर्व नेते या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा पाच वर्षे तपास लावता आला नाही, शेजारच्या राज्यातील पोलिसांनी माहिती दिली आणि दाभोलकर यांच्या हत्येचे धागेदोरे सापडले. आता काही राजकीय लोकांचाही समावेश आहे हे उघड होत आहे. कट ज्यांनी रचला त्यांच्या मुळाशी सरकारने जायला हवे. मास्टमाईंड आणि मारेकरी दोघांचाही छडा लागला पाहिजे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्र पोलिस या तपासात कमी पडली. बाजूच्या राज्यातील पोलिसांनी सहकार्य केले म्हणून दाभोलकर यांचे मारेकरी पकडले गेले. सनातनचे कार्यकर्ते यात सहभागी होते. सरकारने याबाबत आणखी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सनातनवर कारवाई करण्याचे निवेदन याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र तेव्हा सनातन एवढी ताकदवान होईल असे वाटले नव्हते. पण आता विचारवंतांच्या हत्येत यांच्या नावाचा समावेश दिसत आहे, असे ते म्हणाले.  त्यामुळे दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येची निरपेक्ष, पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सगळ्यांपर्यंत सरकारने पोहोचायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली.


गोरक्षकांबाबत बोलताना जयंत म्हणाले की, गोरक्षकांना रोजगार देण्याचे बोलले जात आहे. मध्यंतरी गोरक्षणाच्या नावाखाली समाजात अशांतता माजवण्याचे काम केले जात आहे. अल्पसंख्याक समाजातील लोकांची गोरक्षणाच्या नावाखाली हत्या केली जात आहे. हवे तर गोशाळा बांधा पण गोरक्षकांना रोजगार देणे योग्य वाटत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. गोरक्षकांपेक्षा सरकारने गोसेवक बनवावेत अशी मागणी त्यांनी केली. 

रुपयाचे अवमूलन होत आहे. रुपयाने ७० चा आकडा पार केला आहे. जेव्हा एका पैशाचे अवमूलन होते तेव्हा १२ हजार कोटींची तूट निर्माण होते. यावर संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी माजी आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे मार्गदर्शन मागितले आहे. राजन चार वर्षांपूर्वी हेच सांगत होते तेव्हा सरकारने त्यांचे ऐकले नव्हते आणि आता मार्गदर्शन मागत आहेत, याबाबत जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सहकार विभाग सहकार क्षेत्राबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत बोलताना त्यांनी कापसाचा, ऊसाचा, साखरेचा धंदा संकटात आला आहे. या श्वेतपत्रिका काढून संस्थाचालकांमुळे झाले असा चुकीचा प्रचार सरकारने करू नये. श्वेतपत्रिका काढावी मात्र ज्यांनी चूक केली त्यांना शासन करावे, सहकार क्षेत्राची बदनामी करू नये, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.संबंधित लेख