आरोग्य शिबीरांद्वारे डॉक्टर सेलने पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवावी – जयंत पाटील

22 Aug 2018 , 06:38:06 PM

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या डॉक्टर सेलची बैठक प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पक्षाच्या संघटनेसाठी डॉक्टर सेलच्या वतीने कशा पद्धतीने कार्यक्रम घेण्यात यावे याचे मार्गदर्शन पाटील यांनी बैठकीदरम्यान केले. डॉक्टर सेलच्या वतीने राज्यात आरोग्य शिबीरे राबवण्यासाठी तयारीला लागण्याची गरज आहे. मतदाराला आपल्या पक्षाची भूमिका समजवण्याची गरज आहे, हे काम आपल्याकडून चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा सल्ला त्यांनी दिला. स्वतःच्या मतदारसंघात गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला डॉक्टर सेलच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वतीने मदत करावी. आपल्या विभागात त्याबद्दलची सोय नसेल तर इतर ठिकाणी त्याची सोय करण्याचा प्रयत्न करावा. यातून पक्षाची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचेल. आरोग्य शिबीरांद्वारे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आलेल्या गोष्टी डॉक्टर सेलच्या माध्यमातून नक्कीच कार्यान्वयित करू असे आश्वासन डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांनी दिले. या संदर्भातील अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. डॉक्टर भेटीचा कार्यक्रम जनसामान्यांसाठी राबण्यात येईल, याचा फायदा आपल्याला येत्या निवडणुकीत नक्कीच होईल, निवडणूक तोंडावर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॉक्टर सेलच्या वतीने कोणत्याही गोष्टीची कमतरता होऊ देणार नाही याची ग्वाही डॉ. काळे यांनी यावेळी दिली.

पक्षाच्या संघटनेसाठी डॉक्टर सेलची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले काम चोखपणे पार पाडले जाते. राजकारण न करता पक्षासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर सेलचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कौतुक केले. आपल्या पक्षाचा संदेश घरोघरी पोहचवण्याचे काम हे डॉक्टर सेलच्या माध्यमातूनच पूर्ण होते, असे म्हणत त्यांनी डॉक्टर सेलला शुभेच्छा दिल्या.

या बैठकीला कोषाध्यक्ष हेमंत टकले, आमदार प्रकाश गजभिये, सरचिटणीस बसवराज नगराळकर तसेच राज्यातील डॉक्टर सेलचे पदाधिकारी व डॉक्टर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख