छगन भुजबळांविषयी शिवराळ भाषा अधिकाऱ्याला पडली महाग, पोलीस उपनिरीक्षकास आजच्या आज निलंबित करण्याची अध्यक्षांची सूचना

18 Jul 2018 , 11:08:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी वापरलेली शिवराळ भाषा श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना चांगलीच महागात पडली आहे. छगन भुजबळ यांच्याविषयी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शिवराळ भाषा वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाधव यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल केला. या हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय देताना जाधव यांना आजच्या आज निलंबित करण्याची सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भिमराव नलगे या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत धिंगाणा केला आणि छगन भुजबळ यांना शिवीगाळ केली. महावीर जाधव यांच्याविरोधात आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करत आहोत तो हक्कभंग समितीने पुढे न्यावा, असे आव्हाड म्हणाले. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'मी त्या गावाला कधी गेलो नाही, त्या अधिकाऱ्यांना मी ओळखत नाही. ज्यांच्या घरात तो शिरला त्यांना मी ओळखत नाही. तरी माझ्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केले गेले'. अधिकाऱ्यांना ऐवढी कसली मस्ती आली आहे? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून जाधव यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनेते अजित पवार यांनी केली. छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे माजी महापौर राहिले आहेत. त्यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या जाधवला तात्काळ निलंबित करा, असेही ते म्हणाले. 

आपल्या हक्कभंगाच्या प्रस्तावावर मत व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रातील आमदारांचा अपमान केला जात आहे. अधिकारी मुजोर झाले आहेत. शिवीगाळ करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत कशी होते? अशा मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.

या प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी वेलमध्ये उतरून आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महावीर जाधव याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित लेख