विकासाच्या वाटेने जाता न आल्याने सरकार नसते उद्योग करते आहे - जयंत पाटील

16 Jul 2018 , 06:42:09 PM

राष्ट्रीय अधिस्विकृती परिषदेकडून (NAAC) A मूल्यांकन मिळालेल्या महाविद्यालयांना भगवद्गीता वाटण्याचा प्रकार म्हणजे सरकारचा प्रसिद्धी मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. सध्या शाळांमध्ये विदयार्थ्यांना अभ्यासक्रम नीट शिकवले जात नाहीत, विद्यापीठे नीट चालवली जात नाहीत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वेळेवर मिळत नाहीत आणि त्यात सरकार विद्यार्थ्यांना भगवद्गीता वाचायला लावण्याचा प्रयत्न कशासाठी करते आहे ? असे प्रकार महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते. विकासाच्या वाटेने जाता न आल्याने सरकार असे उद्योग करत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 या विषयावर त्यांनी सरकारला खालील प्रश्न विचारले आहेत : 
1. भगवद्गीता वाटण्याच्या सरकारच्या निर्णयाचा उद्देश काय..? 
2. केवळ A ग्रेड असणाऱ्या कॉलेजनाच भगवतगीता का वाटण्यात आली.? 
3. भगवद्गीतेसोबत गुरुग्रंथसाहेब, कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ का देण्यात आले नाहीत.?
4. फक्त भगवद्गीता देण्याचा निर्णय कोणत्या तर्काने ठरवला गेला ? 
5. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवद्गीता वाचली आहे का?
6. यापुढील काळात बक्षीस म्हणून सरकार भगवद्गीताच देणार आहे का ? 
7. सत्तेत आल्यानंतर आत्तापर्यंत सरकारने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात कोणते आमूलाग्र बदल घडवून आणले?
साऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करते आहे, असे महाराष्ट्रातील तमाम जनतेला वाटते आहे. शाळांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याच्या चुकीच्या प्रथा सरकारने पाडू नये. आम्ही भगवद्गीतेच्या विरोधात नाही मात्र महाविद्यालयांमध्ये ते वाटण्याची आवश्यकता नव्हती, असे विचार पाटील यांनी मांडले आहेत. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा. पंतप्रधान मोदींना स्वतः ला विकासपुरुष म्हणवणे हा मोठेपणा वाटतो, मात्र आता विकास होत नसल्याने सरकार या वाटेने जात आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख